छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील ‘हॉटेल लेमन ट्री’मध्ये रूम बुकिंगच्या नियमांवरून वाद झाल्यानंतर टवाळखोरांच्या टोळीने हॉटेलमध्ये धिंगाणा घालत व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी रात्री विशाल खाडे, ललित राठोड आणि योगेश दुल्हत यांच्या नावाने ऑनलाइन माध्यमातून हॉटेलमधील रूम क्रमांक १३२ बुक करण्यात आली होती. मात्र, रूमची चावी घेतल्यानंतर आरोपींनी आणखी १० ते १२ जणांना सोबत आणून खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. एका खोलीत केवळ तीन जणांनाच राहण्याची परवानगी असल्याचे सुरक्षा व्यवस्थापक सौरभ काटकर आणि एक्झिक्युटिव्ह शेफ सुशील जोशी यांनी सांगितले. त्यावेळी आरोपींनी वाद घालत कर्मचाऱ्यांना धमकावले. परिस्थिती चिघळत असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. आरोपींनी दुसरी खोली बुक करण्याची तयारी दर्शवल्यानंतर पोलिस तेथून निघून गेले.

यानंतर आरोपींच्या टोळीने पुन्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. टोळीतील एका तरुणाने चक्क अंतरवस्त्रांवर हॉटेलच्या लॉबीत फिरत दहशतीचे वातावरण निर्माण केले. तसेच रात्री स्विमिंग पूल बंद झाल्यानंतरही आरोपी पूलमध्ये उतरले. कर्मचाऱ्यांनी बाहेर येण्याची विनंती करताच त्यांनी तेथील साहित्याची फेकाफेक केली आणि हॉटेलचे एचआर मॅनेजर रवी गंगावणे यांच्यासह दोन ते तीन कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या प्रकरणी राहुल हिंगे, दिनेश घावट, प्रदीप राजपूत, दत्ता हिंगे, राजीव कोलते, सगपान नरवडे, योगेश दुल्हत, विशाल खाडे आणि राजकुमार जैना यांच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार भाऊसाहेब जगताप पुढील तपास करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,532 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क