छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात आज दहावीच्या निकालाची उत्सुकता असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुंडलिक नगर परिसरात घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून विद्यार्थ्यांवरील मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोहम ज्ञानेश्वर मोरे (वय १७, रा. पुंडलिक नगर, गल्ली क्रमांक १०) हा विद्यार्थी दहावीमध्ये शिक्षण घेत होता. आज राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याने तो काही दिवसांपासून चिंतेत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. आज सकाळी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी तातडीने त्याला खाली उतरवून रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुंडलिक नगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, दहावीच्या निकालाच्या तणावातून किंवा भीतीतून विद्यार्थ्याने हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यास, परीक्षा आणि निकालाच्या तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालकांनी मुलांशी सतत संवाद साधून त्यांना मानसिक आधार देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*