छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एकदा चेन स्नॅचिंगची घटना समोर आली असून काल सकाळच्या वेळी दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीकृष्णनगर, देवळाई परिसरात घडली आहे.
याप्रकरणी अल्का कैलास कासलीवाल (वय ७५, रा. श्रीकृष्णनगर, बिड बायपास, देवळाई शिवार) यांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या ८ मे रोजी सकाळी आपल्या पतींसोबत देव दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन आटोपून दोघे पायी घरी परतत असताना अचानक समोरून लाल रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि वेगाने बिड बायपास रोडमार्गे देवळाई चौकाच्या दिशेने पळ काढला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकही जमा झाले, मात्र आरोपी पसार झाले.
या प्रकारात मिनी गंठणाचा काही भाग तुटून महिलेजवळ राहिला, तर उर्वरित सोन्याचा भाग आरोपी घेऊन फरार झाले. चोरीस गेलेल्या सोन्याच्या मिनी गंठणाची किंमत सुमारे ७० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपींचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून ते सडपातळ बांध्याचे आणि सावळ्या वर्णाचे असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, चिकलठाणा पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*