छत्रपती संभाजीनगर :  जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे शनिवारी (ता. ९) रात्री अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. शेतातील विहिरीत उतरून मोटार पंप बसवण्याचे काम सुरू असताना अचानक विहिरीचा काही भाग खचल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृतांमध्ये बाजीराव सर्जेराव काकडे, त्यांचे पुत्र आजिनाथ बाजीराव काकडे आणि शाम बाजीराव काकडे यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिघेही शेतातील विहिरीत उतरून मोटार पंप बसवण्याचे काम करत होते. काम सुरू असतानाच अचानक विहिरीचा काही भाग कोसळला आणि मोठ्या प्रमाणात माती व दगडांचा ढिगारा विहिरीत पडला. त्यामुळे तिघेही ढिगाऱ्याखाली अडकले.

घटनेचा मोठा आवाज ऐकून ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रयत्नांनी ढिगारा हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघेही गंभीररीत्या दबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने काकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

काकडे कुटुंब गावात मेहनती, शांत स्वभावाचे आणि मदतीला धावून जाणारे म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण धानोरा गाव शोकमग्न झाले आहे. रविवारी सकाळी ११ वाजता धानोरा येथील स्मशानभूमीत तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांकडून काकडे कुटुंबाला श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

781 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क