छत्रपती संभाजीनगर : शहरात भामट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून आता हे टोळके नागरिकांना विविध प्रकारे गंडा घालत आहेत. सोमवारी सकाळी पुंडलिकनगर परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून तिघा भामट्यांनी 67 वर्षीय ज्येष्ठ महिलेची तब्बल 3 लाख 55 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कंवरबाई लुंकड या सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे जैन मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतत होत्या. त्या छत्रपती कॉलेजसमोरील रस्त्यावरून पायी जात असताना काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर आलेल्या तिघांनी त्यांना अडवले. यावेळी आरोपींनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगत परिसरात चोरीच्या घटना वाढल्याची माहिती दिली. तसेच अंगावरील सोन्याचे दागिने घालून फिरणे धोकादायक असल्याचे सांगून ते दागिने काढून पिशवीत ठेवण्याचा सल्ला दिला.

आरोपींनी विश्वास बसावा यासाठी बनावट पोलीस ओळखपत्रदेखील दाखवले. महिलेचा विश्वास बसल्यानंतर त्यांनी सोन्याच्या पाटल्या, दोन कंठ्या आणि अंगठ्या कागदात गुंडाळून सुरक्षित ठेवत असल्याचे नाटक केले. मात्र, अत्यंत चलाखीने त्यांनी दागिन्यांऐवजी पिशवीत खडे आणि बनावट कडे ठेवले. काही वेळानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले.

घरी पोहोचल्यानंतर कंवरबाई यांनी पिशवी उघडून पाहिली असता त्यांना फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. यानंतर त्यांनी तातडीने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, तसेच पोलीस असल्याचा दावा करणाऱ्यांची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

885 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क