छत्रपती संभाजीनगर : शहरात ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून फसवणूक आणि लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घराबाहेर फेरफटका मारणे, किराणा खरेदीसाठी जाणे किंवा एटीएममधील व्यवहार करणेही आता वृद्धांसाठी धोकादायक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गोड बोलून ओळख असल्याचे भासवणे, मदतीचा बहाणा करणे किंवा खोटे आमिष दाखवून वृद्धांची फसवणूक केली जात आहे.

अशाच एका घटनेत ८५ वर्षीय कमल पाटील या १३ मे रोजी सकाळी किराणा दुकानाकडे जात असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांना अडवले. “मी तुमच्या मुलाचा मित्र आहे,” असे सांगत त्याने त्यांना गप्पांमध्ये गुंतवले. त्यानंतर “तुमच्या नावाने पैसे आले आहेत” असे सांगून त्यांना रस्त्याच्या कडेला नेले. हातावर काही पैसे ठेवत “दागिन्यांचे वजन करून पैसे द्यायचे आहेत” असे सांगत त्यांच्या हातातील सोन्याच्या चार बांगड्या हिसकावून आरोपी पसार झाला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, एटीएम केंद्रांमधील फसवणुकीचे प्रकारही सुरूच आहेत. सेवानिवृत्त हानिफ युसूफ बेग (७३) हे शहानुरमिया दर्गा परिसरातील एटीएममध्ये गेले असता एका व्यक्तीने तांत्रिक अडचणीचे कारण सांगून मदतीचा बहाणा केला. त्यांचा पासवर्ड पाहून आरोपीने कार्डची अदलाबदल केली आणि तासाभरात विविध ठिकाणी व्यवहार करून ८१ हजार ५०० रुपये काढले.

गेल्या काही आठवड्यांत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. दान, मदत, बँकेत पैसे आल्याचे आमिष किंवा एटीएम सहाय्याच्या नावाखाली वृद्धांना लक्ष्य केले जात आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अनोळखी व्यक्तींवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

956 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क