मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या ३४ आंदोलकांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयासाठी एकूण ३ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सातत्याने लावून धरलेल्या मागणीला अखेर यश मिळाल्याचे मानले जात आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर विविध टप्प्यांमध्ये आंदोलने झाली होती. या आंदोलनांशी संबंधित घटनांमध्ये अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. शासनाने यापूर्वी काही कुटुंबांना मदत जाहीर केली होती, मात्र अनेक कुटुंबांना अद्याप आर्थिक सहाय्य मिळाले नव्हते. हा प्रश्न मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथील उपोषणादरम्यान ठामपणे उपस्थित केला होता.

या मागणीची दखल घेत मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शासनाने प्रलंबित राहिलेल्या ३४ कुटुंबांना तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. शासन मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असून दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या महिन्याच्या अखेरीस मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले होते. शासनाच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याचे सांगत त्यांनी उपोषण मागे घेतले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठा समाजाला न्याय देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले होते.

मंजूर निधीचा लाभ बीड जिल्ह्यातील १५, धाराशिवमधील ५, परभणी व हिंगोलीमधील प्रत्येकी ४, नांदेडमधील ३ तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाला मिळणार आहे. या निर्णयामुळे संबंधित कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

935 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क