छत्रपती संभाजीनगर : रेशनिंगसाठी तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या शालेय पोषण आहार योजनेसाठी असलेला मोठा धान्यसाठा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. किराडपुरा परिसरातील एमआर फंक्शन हॉल येथे करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे १५ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गोदामात रेशनिंगचे धान्य साठवून त्याची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सकाळी छापा टाकला. कारवाईदरम्यान समीर कुरेशी, फरदीन गणी पठाण आणि फहाद लईक शुत्तारी यांना ताब्यात घेण्यात आले.
छाप्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांसाठी असलेली साखर, तांदूळ, गहू, ज्वारी आणि मका यांचा मोठा साठा आढळून आला. याशिवाय वजनकाटा, डिझेल आणि धान्य वाहतुकीसाठी वापरला जाणारा आयशर ट्रकही जप्त करण्यात आला. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १५ लाख ७५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कारवाईदम्यान त्याच परिसरातील दुसऱ्या खोलीत महिला व बालविकास विभागाच्या पोषण आहार योजनेसाठी असलेले साहित्यही आढळून आले. अंगणवाडीतील सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालके तसेच गरोदर व स्तनदा मातांसाठी शासनाकडून मोफत पुरविण्यात येणारे एनर्जी डेन्स तूरडाळ खिचडी प्रीमिक्स, मूगडाळ खिचडी प्रीमिक्स आणि मल्टिमिक्स सीरियल्स अँड प्रोटीन्स प्रीमिक्स यांचे पॅकिंग फोडून ते गोण्यांमध्ये भरल्याचे निदर्शनास आले. हे साहित्य विक्रीसाठी तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी जिल्हा सहायक पुरवठा अधिकारी संदीप शिंदे यांच्या तक्रारीवरून समीर बाबर कुरेशी, फहाद लईक शुत्तारी, फरदीन गणी पठाण, आवेज कुरेशी, कलीम छोटू कुरेशी आणि अन्य साथीदारांविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*