छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील गंगापूर-भेंडाळा फाटा महामार्गावर बाबरगाव फाट्याजवळ शनिवारी (ता. 13) सकाळी सुमारे 10 ते 10.15 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन जणांसह कंटेनर चालकाचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहून भेंडाळा फाटा-गंगापूर मार्गे शिर्डीकडे देवदर्शनासाठी निघालेली स्कुटी (एमएच 20 एचयू 4407) आणि समोरून येणारा कंटेनर (केए 56 8768) यांची बाबरगाव फाट्याजवळ जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीला कंटेनरने काही अंतरापर्यंत फरफटत नेले. त्यामुळे दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर कंटेनरही रस्त्यावर पलटी झाला असून त्याचे मोठे नुकसान झाले.

या भीषण अपघातात स्कुटीवरील डॉ. महादेव चंद्रकांत घुले (वय 30, रा. जालना) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या मीरा कडूबा पांडव (वय 23, रा. गुंडेवाडी, ता. जि. जालना) या गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे आणि सागर शेजूळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान मीरा पांडव यांचीही प्राणज्योत मालवली.

दरम्यान, हैदराबादकडे माल घेऊन जाणाऱ्या कंटेनरचे चालक राजकुमार देवेंद्र अप्पा (वय 46, रा. मंगलगी, जि. बिदर, कर्नाटक) यांचाही या अपघातात मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी रिझवान शेख, प्रकाश सातपुते आणि विष्णू बापते यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,147 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क