छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासवरील एचडीएफसी बँकेसमोर उभी असलेल्या फॉर्च्यूनर कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केल्याची धक्कादायक घटना ११ जून रोजी सकाळी घडली. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैसल जाबेद खान (वय २५, रा. देवळाई) हे प्लॉटिंग व्यवसाय करतात. बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजता ते जुबेर कलीम शेख, सलमान नवाब पटेल आणि समीर अकबर शेख यांच्यासह फॉर्च्यूनर कारमधून (एमएच २० एचजे ७१११) बीड बायपासवरील एचडीएफसी बँकेत गेले होते. त्यांना एकूण ३० लाख रुपये बँकेत जमा करायचे होते.

यापैकी १० लाख रुपये त्यांनी बँकेत जमा केले. मात्र, उर्वरित २० लाख रुपये जमा करण्यासाठी अतिरिक्त खर्च येणार असल्याने त्यांनी ती रक्कम कारमध्ये ठेवली. कार लॉक करून सर्वजण बँकेत आरटीजीएससाठी आवश्यक कागदपत्रे भरत होते. दरम्यान, बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याने धावत येत बाहेर एका वाहनाची तोडफोड सुरू असल्याची माहिती दिली.

त्यानंतर फैसल खान व त्यांचे सहकारी बाहेर आले असता फॉर्च्यूनरच्या पुढील डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडण्यात आल्याचे दिसून आले. तसेच कारमध्ये ठेवलेली २० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

घटनेनंतर फैसल खान व त्यांच्या नातेवाईकांनी दुचाकीवरून चोरट्यांचा पाठलाग केला. सूर्या लॉन्स परिसरापर्यंत त्यांनी पाठलाग केला, मात्र चोरटे झाल्टा फाट्याच्या दिशेने वेगाने पसार झाले. चोरट्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक कोकणे करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

993 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क