सावत्र पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर तब्बल सात महिने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडितेच्या फिर्यादीनुसार, २०१२ मध्ये तिच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर तिच्या आईने २०१६ मध्ये आरोपीशी पुनर्विवाह केला. आरोपी रुग्णालयात वार्डबॉय म्हणून काम करत होता. जानेवारी २०२४ मध्ये, शाळेतून परतल्यानंतर, पीडिता जेवण करून घरी झोपली असताना, घरी एकटे असलेल्या आरोपी पित्याने तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केला. या घटनेची कोणाला माहिती दिल्यास, तिला आणि तिच्या आईला घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने हे प्रकरण गुपित ठेवले.
अशा प्रकारे अत्याचार चालूच राहिले, आणि १८ जुलै रोजी पुन्हा तिच्यावर अत्याचार करण्यात आला. काही दिवसांनी पीडितेला वारंवार पोटदुखीची तक्रार आल्याने, तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यानंतर पीडितेने संपूर्ण घटना सांगितली. २८ ऑगस्ट रोजी पीडितेची तपासणी करण्यात आली असता, ती आठ महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले.
प्रकरणाची गंभीरता ओळखून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर करण्यात आलेल्या आरोपीला पीडितेच्या गर्भातील अर्भकाची डीएनए चाचणी करण्यासाठी आणि वैद्यकीय तपासणीसाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*