गारखेडा परिसरात अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त पुरवून मदत करण्याच्या बदल्यात पैसे मागितल्याच्या आरोपावरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक राजेश यादव आणि अंमलदार सुरेश बाबू सिंग पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चौकशीनंतर शुक्रवारी, ३० ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार हा ३८ वर्षीय नागरिक असून, त्याच्याकडे गारखेडा परिसरात २४ हजार स्केअर फूट जागा आहे. या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी त्याने पुंडलिकनगर पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली होती. मात्र, पोलिस निरीक्षक यादव आणि अंमलदार पवार यांनी या कामासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली. या व्यवहारानुसार, अतिक्रमण हटविल्यानंतर उर्वरित १ लाख रुपये देण्याचे ठरले होते.
त्यानुसार, ३ एप्रिल रोजी अंमलदार पवार यांनी तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारले. मात्र, अपेक्षित काम न झाल्यामुळे तक्रारदाराने यादव आणि पवार यांच्याशी संपर्क साधला. यावेळी, काम न झाल्यामुळे पैसे दोन टप्प्यांत परत देण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. या सर्व घडामोडींचे चित्रीकरण तक्रारदाराने केले आणि नंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीच्या आधारे, पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात यादव आणि पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली असून, पुढील तपास एसीबी करत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*