गंगापूर : भारत फायनान्शियल कंपनीच्या गंगापूर शाखेतील महिला सदस्यांकडून वसूल केलेली ६८ हजार ५६ रुपयांची रोकड हडपण्यासाठी स्वतःवर चाकूने वार करून जबरी चोरीचा बनाव रचणाऱ्या क्षेत्र सहायकासह तिघांचा कट गंगापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत उघडकीस आणला. याप्रकरणी क्षेत्र सहायक किरण पंढरीनाथ वैरागर, त्याचा साथीदार रवी ज्ञानदेव दरंदले आणि विधीसंघर्ष बालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारत फायनान्शियल कंपनीचे गंगापूर शाखा व्यवस्थापक योगेश तुळशीराम गिते यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. किरण वैरागर हा कंपनीत क्षेत्र सहायक म्हणून कार्यरत असून, सोमवारी तो लासूर परिसरातील महिला सदस्यांकडून कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी गेला होता. सायंकाळी त्याने शाखा व्यवस्थापकांशी फोनवरून संपर्क साधल्यानंतर त्याचा मोबाइल अचानक बंद झाला.

काही वेळाने एका अज्ञात व्यक्तीने व्यवस्थापकांना फोन करून लासूर-गंगापूर रस्त्यालगत किरण हात-पाय बांधलेल्या अवस्थेत जखमी पडल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्याच्या हातावर, छातीवर आणि पाठीवर चाकूने वार केल्याच्या जखमा आढळल्या. त्याचा शर्टही फाटलेला होता.

किरणने पोलिसांना चार अनोळखी व्यक्तींनी शेतात नेऊन चाकूने वार करत ६८ हजार ५६ रुपयांची रोकड लुटल्याचा दावा केला. मात्र, त्याच्या जबाबातील विसंगतीमुळे पोलिसांचा संशय बळावला. तांत्रिक तपास आणि कसून चौकशीनंतर किरणनेच रोकड हडपण्यासाठी जबरी चोरीचा बनाव रचल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

किरणचा मित्र रवी दरंदले याला पैशांची अडचण असल्याने हा कट आखण्यात आला होता.  विधीसंघर्ष बालकही या कटात सहभाग असल्याचे तपासात समोर आले. स्वतःवर चाकूने वार करून, हात-पाय बांधून घेत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

उपविभागीय पोलीस अधिकारी जान्हवी शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, सहायक पोलीस निरीक्षक विनायक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फतार्डे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

177 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क