Illegal-Sand-Mafia-Attack-Tahsildar-Team-Sillod
विजय शेजुळ, प्रतिनिधी / सिल्लोड: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. सिल्लोड तालुक्यात तहसीलदारांच्या पथकावर हल्ला करत त्यांच्या वाहनावर दगडफेक केल्याची घटना घडली. रात्री अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या पथकावर हा हल्ला झाला.
सिल्लोड तालुक्यातील उपळी चौफुली येथे तहसीलदारांचे पथक अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेले होते. रात्री दहा वाजताच्या सुमारास गस्त घालणाऱ्या अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टरने अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे पाहिले. त्यांनी ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाळू तस्करांनी तहसीलदारांच्या वाहनावर लिक्वीडसदृश पदार्थ टाकला आणि समोरील काचा फोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर आरोपी ट्रॅक्टरसह फरार झाले.
या घटनेत तहसीलदारांचे अंगरक्षक, वाहनचालक आणि सहा तलाठी असे एकूण नऊ जण होते. या हल्ल्यामुळे प्रशासनावर मोठा आघात झाला असून, वाळू माफियांना रोखण्यासाठी अधिक कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी शंकर जैस्वाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*
