Chhatrapati Sambhajinagar Nurse Murder
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या दवाखान्यात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेचा लासूर स्टेशन परिसरात खून करून मृतदेह शेतातील घरात खड्डा करून पुरल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. सहा दिवसांनंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असून, रात्री उशिरा शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत परिचारिकेचे नाव मोनिका मार्कस झांबरे (वय ३०) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका झांबरे या तरुणीचा विवाह छत्रपती संभाजीनगरच्या सुमित निर्मळ याच्याशी झाला होता. मात्र, सततच्या वादांमुळे ती जालना येथे आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. ती दररोज जालना ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेने प्रवास करून नोकरीला जात होती. मात्र, ६ फेब्रुवारी रोजी ती घरी पोहोचली नाही. तिच्या आईने पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली होती.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना लासूर स्टेशन येथील इरफान शेख याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने मोनिकाचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर मृतदेह त्याच्या शेतातील घरात पुरल्याचे उघड झाले.
१४ फेब्रुवारी रोजी मोनिकाच्या आई व नातेवाईकांच्या उपस्थितीत पोलिसांनी घरात उत्खनन केले. त्यावेळी मोनिकाचा मृतदेह नग्नावस्थेत कुजलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळीच डॉक्टरांना बोलावून शवविच्छेदन केले. रात्री उशिरा सिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नातेवाईकांचा गंभीर आरोप:
मोनिकाच्या आईच्या तक्रारीनुसार, आरोपी इरफान शेख याने मोनिकाचा पती सुमित निर्मळ, सासू सपना निर्मळ आणि सासरे संजय निर्मळ यांच्या सांगण्यावरून हा खून केला. तिच्यावर अत्याचार करून खून केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
मृतदेह खड्डा करून पुरला होता, त्यामुळे खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*