Pune-Swargate-Rape-Case-Accused-Arrested
पुणे : स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांना चकवा देत असलेल्या या आरोपीला शुक्रवारी पहाटे स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाने पकडले. शिरूर तालुक्यातील गनाट गावात उसाच्या चारीत लपून बसलेल्या आरोपीला शोधण्यासाठी तब्बल १५०-२०० पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि हा वासनांध आरोपी गजाआड झाला.
मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात एक २६ वर्षीय कौन्सिलर तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती. ही तरुणी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली असता, आरोपीने तिच्याशी गोड बोलून ओळख वाढवली आणि तिला शिवशाही बसमध्ये नेऊन जीव मारण्याची धमकी देत अत्याचार केला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती.
स्वारगेट पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली. मात्र त्याला पकडण्याआधीच तो फरार झाला. पुणे पोलिसांनी शहरभर शोधमोहीम राबवली, रेल्वे स्थानक, बस स्थानके, मित्रमंडळी आणि नातेवाईकांची चौकशी केली. पण आरोपी कुठेही सापडला नाही.
गावात पोलिसांची शोधमोहीम आणि बक्षीस जाहीर
पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तपासादरम्यान, त्याचं शेवटचं लोकेशन त्याच्या मूळ गावाजवळ आढळले. त्यामुळे पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गनाट गावाला घेराव घातला. तब्बल १५०-२०० पोलिसांनी गावात तपास सुरू केला.
गावाजवळ मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती असल्याने आरोपी उसाच्या शेतात लपून बसला असावा, अशी शक्यता होती. पोलिसांनी खबरदारी घेत संपूर्ण भागाची पाहणी केली. ड्रोनच्या साहाय्याने देखील शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र संध्याकाळी अंधार पडल्याने शोध थांबवावा लागला.
स्वारगेट तपास पथकातील शंकर संपते, सागर केकान, नाना भांदुर्गे, कुंदन शिंदे आणि सुजय पवार हे कर्मचारी पहाटे दीड वाजता अलर्ट मोडवर होते. याचवेळी एका ऊसाच्या चारीत संशयास्पद हालचाल दिसली. त्यांनी लगेच त्या ठिकाणी जाऊन आरोपीला पकडले. ग्रामस्थांनी त्याची ओळख पटवून दिल्यानंतर पोलिसांनी त्वरित त्याला गाडीत टाकून पुण्याच्या दिशेने रवाना केले.
पोलिसांची यशस्वी कारवाई
आरोपीला लष्कर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून, त्याला लवकरच कोर्टात हजर केले जाईल. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणाच्या तपासावर आहे. तीन दिवस पोलिसांना चकवा देणाऱ्या या आरोपीला अखेर पकडण्यात यश आल्याने पुणे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*