मुंबई – राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. येत्या 10 मार्च रोजी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र, या अधिवेशनात अर्थसंकल्पासोबतच अनेक राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आग्रही आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचे नाव चर्चेत आले आहे, तसेच कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपांमुळे त्यांच्यावर राजकीय दबाव वाढला आहे. दरम्यान, बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री कोट्यातील फ्लॅट लाटल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे विरोधक दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत.
याशिवाय, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, तसेच महिलांवरील अत्याचारांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील.
राज्यातील शेतकरी कर्जमाफी, महागाई, वीज दरवाढ, बेरोजगारी आणि मराठा आरक्षणासारखे महत्त्वाचे विषयही चर्चेत राहतील. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता असून, सरकारला या सर्व मुद्द्यांवर खुलासे द्यावे लागणार आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*