वाळूज : वाळूज औद्योगिक वसाहतीलगतच्या रामराई शिवारातील एका शेतवस्तीवर रविवारी (ता. १८) मध्यरात्रीनंतर दरोडेखोरांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकला. आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तोंड बांधून हल्ला करत घरातील तीन व्यक्तींना बेदम मारहाण केली. यात एक महिला व तरुणी गंभीर जखमी झाल्या असून, दरोडेखोरांनी एकूण ४८ हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामराई गावालगत असलेल्या शिवारात दिगंबर धोंडिराम वाघमारे यांची शेतवस्ती आहे. येथे तीन खोल्यांचे घर असून, वाघमारे कुटुंबातील एकूण नऊ सदस्य वास्तव्यास आहेत. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सर्वजण झोपले होते. मध्यरात्री एका वाजता दिगंबर वाघमारे यांच्या सून संगीता यांनी आवाज ऐकून खिडकीतून बाहेर पाहिले. कोणीतरी आहे हे लक्षात आल्यानंतर त्या लघुशंकेसाठी बाहेर गेल्या, त्यांच्यासोबत मुलगी गायत्रीही होती. याचवेळी भिंतीमागे लपलेले दरोडेखोर अचानक समोर आले आणि त्यांनी दोघींनाही काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, घरातील इतरांनी आवाज ऐकून दरवाजे उघडले असता दरोडेखोरांनी त्यांनाही धमकावले. दिगंबर वाघमारे यांना देखील काठीने मारहाण करण्यात आली. त्यांच्या डोक्यात गंभीर इजा झाली. त्यांच्या पत्नी सुमनबाई यांना चाकूचा धाक दाखवून सोन्याची पोत हिसकावून घेतली. दरोडेखोरांनी सर्व खोलीतील कपाटे उचकली व सुमारे ४८ हजारांचा ऐवज लंपास केला.
दरोडेखोर हिंदी भाषेत संवाद साधत होते आणि “तुम्हारे पास का सोना-पैसा निकालो” अशी धमकी देत होते. रामदास वाघमारे यांच्या पत्नी हिराबाई यांच्याकडील मंगळसूत्रही हिसकावून घेतले. रामदास यांनी पाठिमागील दाराने शेजारी शंकर वाघमारे यांना बोलावले. ते बॅटरीच्या उजेडात घटनास्थळी पोहोचत असल्याचे पाहून दरोडेखोरांनी पलायन केले.
दिगंबर यांचा नातू प्रसाद याने पळणाऱ्या दरोडेखोरांपैकी एकाला पकडले होते, मात्र इतर दरोडेखोरांनी दगडफेक करत त्याला सोडवून नेले. घटनास्थळी दारूची बाटली, मासा आणि परफ्युमच्या बाटल्या आढळून आल्या. श्वानपथक व ठसेतज्ञांनी घटनास्थळी तपास केला.
याप्रकरणी रामदास वाघमारे यांच्या तक्रारीवरून अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे अधिक तपास करत आहेत. दरम्यान, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून कसून चौकशी सुरू आहे.
पोलीस फौजफाटा घटनास्थळी
दरोड्याची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सहाणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, उपनिरीक्षक शितोळे यांच्यासह श्वानपथक, ठसेतज्ञ आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. जखमींना तत्काळ घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सकाळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*