छत्रपती संभाजीनगर: बजाजनगर येथील आर. एल. सेक्टरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर १५ मे रोजी पडलेल्या दरोड्याप्रकरणी रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात वडगाव कोल्हाटी येथील शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या देवीदास नाना शिंदे (४५) यानेच लड्डा यांच्या घरातील संपत्तीबाबत माहिती देऊन दरोडा टाकण्यास सांगितल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. हे पुराव्यानिशी स्पष्ट होताच गुन्हे शाखेने रात्री शिंदेची अटक केली.
देवीदास शिंदे हा वाळूजमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बसचा चालक आहे. त्याच्यावर २०१६ मध्ये एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेला गुप्तधन व काळी जादू याबाबत अंधश्रद्धा असून, तो मुख्य आरोपी योगेश हाजबेचा जवळचा मित्र आहे. त्यांनी मिळून याआधीही गुप्तधनाच्या शोधासाठी अनेक ठिकाणी खोदकाम केले होते.
शिंदेला लड्डा यांच्या घरी कोट्यवधींची रक्कम असल्याची माहिती हाजबेने दिली होती. त्यानंतर शिंदे व हाजबेने मिळून अमोल खोतकर याला ही माहिती पुरवली. पोलिसांनी शिंदेला माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीलाही ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री दरोड्यातील मुख्य सूत्रधार अमोल खोतकर (३४, रा. पडेगाव) याचा गुन्हे शाखेने एन्काउंटर केला. त्याचे सहकारी योगेश हाजबे, सय्यद अजहरोद्दीन, महेंद्र बिडवे, सुरेश ऊर्फ सूर्यकांत गंगणे आणि सोहेल शेख यांची पोलिस कोठडीत चौकशी सुरू आहे.
दरोड्यापूर्वी रेकीसाठी वापरलेली चारचाकी आणि मोपेड वाहने देखील पोलिसांनी शुक्रवारी जप्त केली आहेत. शिंदेवर आधीपासून संशय होता, आणि हाजबेनेही दरोड्याच्या आधी त्याच्याशी संपर्क साधल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांकडून या प्रकरणातील आणखी खुलासे होण्याची शक्यता असून तपास वेगाने सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*