छत्रपती संभाजीनगर : शहरातील इतिहासातील सर्वात मोठ्या दरोड्याच्या कटाचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात आणखी चार जणांना अटक करण्यात आली असून विशेष बाब म्हणजे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातील रोकड आणि दागिन्यांची माहिती देणारा व्यक्ती त्यांचा बालमित्र बाळासाहेब इंगोलेच निघाला आहे.
या धाडसी दरोड्याची घटना १५ मे रोजी वाळूज परिसरात घडली होती. लड्डा यांच्या घरी साडेपाच किलो सोने, ३० किलो चांदी व मोठी रोकड चोरीस गेली होती. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आतापर्यंत एकूण १० आरोपींना अटक केली आहे. मात्र, अजूनही चोरी गेलेल्या मौल्यवान मालाचा तपास लागलेला नाही.
दरम्यान, पोलिसांनी शुक्रवारी आरोपी देविदास शिंदे याला अटक केल्यानंतर चौकशीतून तीन नव्या आरोपींची नावे समोर आली. यानंतर आज बाळासाहेब इंगोले, आदिनाथ जाधव, गणेश गोराडे, महेश गोराडे यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या तपासात एकमेकांकडे माहिती पोहोचवत अखेर खोतकर आणि हाजबे या दरोडेखोरांपर्यंत ही माहिती कशी पोहोचली याचे पडसाद समोर आले.
शाळेच्या बसचा चालक असलेल्या देविदास शिंदेला महेश गोराडे याने माहिती दिली होती, तर महेशला गणेश गोराडेने, गणेशला आदिनाथ जाधवने, आणि आदिनाथला ही माहिती लड्डा यांचा बालमित्र बाळासाहेब इंगोले याने दिली होती. इंगोले याला लड्डा यांनी आपल्या कंपनीत नोकरी दिली होती आणि बालपणापासूनच्या मैत्रीमुळे त्याला घरातील संपत्तीची संपूर्ण माहिती होती. मात्र, कामाच्या ठिकाणी झालेल्या वादानंतर इंगोलेने लड्डांना धडा शिकवण्याचा कट रचला.
याच आरोपींच्या साखळीने शहरातील सर्वात मोठा दरोडा उघडकीस आणला. हाजबेच्या हॉटेलवर दरोड्याचे नियोजन करण्यात आले होते. खोतकरचा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे, तर इतर आरोपी पोलिस कोठडीत आहेत.
अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –
१. बाळासाहेब चंद्रकांत इंगोले
२. आदिनाथ जाधव
३. गणेश गोराडे
४. महेश गोराडे
५. देविदास नाना शिंदे
६. योगेश सुभाष हाजबे
७. सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबिरोद्दीन
८. महेंद्र माधव बिडवे
९. सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे
१०. सोहेल जलील शेख
तर मुख्य सूत्रधार अमोल खोतकर याला पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. पुढील तपास पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*