छत्रपती संभाजीनगर : यवतमाळकडे जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये चढल्याच्या कारणावरून तिघांनी एकाला बसमधून खाली उतरवून त्याच्या नातेवाइकावर दगडाने हल्ला केला. ही धक्कादायक घटना ३१ मे रोजी रात्री १२.३० वाजता पडेगाव येथील बाबा पेट्रोलपंपजवळील बसस्टॉपवर घडली. या प्रकरणी तिघांविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी निखील अरुण विभुते (वय ३७, व्यवसाय – इलेक्ट्रिशियन, रा. पडेगाव) हे आपल्या मावस भावासोबत क्षितीज भेलोडे यांच्यासोबत यवतमाळला जाण्यासाठी बसस्टॉपवर थांबले होते. दरम्यान, चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस आली. क्षितीज बसमध्ये चढून ड्रायव्हरकडे चौकशी करत असताना सादिक खान जफर खान (२०), नासेर इसा कुरेशी (१९, दोघे रा. टाऊन हॉल, असेफिया कॉलनी) आणि एक अनोळखी इसम यांनी क्षितीजला जबरदस्तीने खाली उतरवले.
“आमच्याशिवाय येथे कोणतीही बस थांबत नाही, आमच्याकडे का आला नाहीस?” असे म्हणत आरोपींनी क्षितीजला दमदाटी केली. हे पाहून निखील विभुते यांनी हस्तक्षेप केला असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी सादिक खान याने हातातील दगडाने निखील यांच्या डोक्यावर जबर वार केला. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मारहाणीनंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*