छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील येसगाव जवळ रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. उसतोड मजुरांना घेऊन जाणारा छोटा हत्ती वाहन पलटी होऊन दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दहा जण गंभीर जखमी झाले.
कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथून २२ उसतोड मजुरांना घेऊन एक छोटा हत्ती वाहन फुलंब्री तालुक्यातील गणोरी गावाकडे निघाले होते. प्रवासादरम्यान येसगावजवळ अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक मारला. यामुळे वाहनाचा तोल जाऊन गाडीने दोन ते तीन पलट्या मारल्या.
या अपघातात संदीप मकरंद गोफणे व संजय साहेबराव गायकवाड (दोघेही रा. भांबरवाडी, ता. कन्नड) हे दोघेजण जागीच ठार झाले. इतर दहा मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ऊसतोड मजुरांचे जीवन असेच हलाखीचे असते. कामाच्या शोधात वर्षानुवर्षे आपले घरदार, कुटुंब मागे ठेवून हे मजूर परगावी जातात. कित्येक महिने ते ऊसाच्या मळ्यात राबत असतात. त्यांच्या कष्टाला आणि जीवावर उदार होऊन केलेल्या प्रवासाला मात्र अशा दुर्घटनांचे सावट कायमच असते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा अपघात ग्रामीण भागातील मजुरांच्या असुरक्षित प्रवासाचे भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आणणारा ठरला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*