वाळुज महानगर : आंबेलोहळ (ता. गंगापूर) येथे आज (शनिवारी ) सकाळी एका २८ वर्षीय तरुणाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. अर्जुन रतन प्रधान (वय २८) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूमागे खूनाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अर्जुन प्रधान याचा मृतदेह एकलहेरा रस्त्याच्या कडेला आढळून आला. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असून, अज्ञात आरोपींनी काहीतरी कारणावरून निर्घृण मारहाण करून हत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाची अवस्था पाहता, मृत्यू अत्यंत क्रूरपणे झाला असल्याचे स्पष्ट होत आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून, तो शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाजवळील परिसराची पाहणी केली असून, काही ठिकाणांवरून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रात्रीच्या वेळी होणारी अनोळखी लोकांची वर्दळ, मद्यपान व वाद यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HxCi3XB18w2Dvq8ojRc05z?mode=ac_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*