मुंबई :  शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा संघटनात्मक बदल करत शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली. पवार गटाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत मावळते अध्यक्ष जयंत पाटील यांनीच शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, जो सर्वानुमते स्वीकारण्यात आला.

शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे जुने व विश्वासू सहकारी मानले जातात. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रीय असून, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत त्यांचा मोठा वाटा आहे. पक्ष फाटल्यानंतरही त्यांनी शरद पवारांची निष्ठेने साथ दिली होती, त्यामुळेच त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९६३ रोजी झाला. वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेले शिंदे हे माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी १९९९ साली जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकत आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती.

ते दोन वेळा जावळीचे, तर दोन वेळा कोरेगावचे आमदार राहिले आहेत. २००९ मध्ये त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव करत कोरेगाव मतदारसंघात यश मिळवले होते. २०१९ साली मात्र त्यांचा पराभव झाला. याशिवाय त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना भाजपच्या छत्रपती उदयनराजेंकडून पराभव पत्करावा लागला.

सध्या शिंदे हे विधान परिषदेचे आमदार असून, विधान परिषदेमध्ये पवार गटाचे मुख्य प्रतोद म्हणून काम पाहतात. प्रदेशाध्यक्षपदी त्यांच्या नियुक्तीने पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा नेतृत्व मिळाले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे. शरद पवारांच्या विश्‍वासास पात्र ठरलेल्या शिंदे यांच्याकडून पक्ष संघटन बळकट करण्याची मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HxCi3XB18w2Dvq8ojRc05z?mode=ac_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,098 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क