छत्रपती संभाजीनगर: गोकुळनगरी, सुधाकरनगर रोड परिसरात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या मुलाला शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ९ लाख ४६ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १० नोव्हेंबर २०२४ ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत ही फसवणूक झाली असून, व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमीन ऐश्वर्या राजपूतसह सात जणांविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर संतोषराव पाटील (७६) हे १० नोव्हेंबर २०२४ रोजी व्हीआयपी ७३-एजीआय ग्रुप या अलायन्झ कंपनीशी संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुपशी जोडले गेले. ग्रुप अॅडमीन ऐश्वर्या राजपूत हिने पाटील यांना शेअर मार्केटमधून मोठ्या नफ्याचे आश्वासन दिले. यावर विश्वास ठेवून पाटील यांनी २७ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२४ दरम्यान ६ लाख ४६ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक केली.
यानंतर, ऐश्वर्या आणि तिच्या सहकाऱ्यांनी पाटील यांना २ जानेवारी २०२५ रोजी २८ लाख ७८ हजार ३१२ रुपयांचा नफा झाल्याची खोटी माहिती दिली. मात्र, प्रत्यक्षात पैसे देण्यास नकार दिला. यामुळे कमी वेळात जास्त नफा मिळत असल्याच्या आमिषाने पाटील यांच्या मुलानेही ३ लाख रुपये गुंतवले.
या प्रकरणात ऐश्वर्या राजपूत, अमित सिन्हा, निशा त्रिवेदी, अनिल मेहता, राजाराम शर्मा आणि तन्वी मुखर्जी यांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
९ जानेवारी रोजी ऐश्वर्याने नफा मिळविलेली रक्कम काढण्यासाठी २० टक्के कमिशन भरण्याची अट ठेवली. शंका आल्याने पाटील यांनी ग्रुपमधील इतर गुंतवणूकदारांशी संपर्क साधला असता, ते बनावट असल्याचे समोर आले. या प्रकरणाने सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकाराबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज अधोरेखित केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L1Hjnh1fHKDJBUpjMQYvag?mode=ac_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*