छत्रपती संभाजीनगर : नवीन मोबाईल न दिल्याच्या कारणावरून फक्त १६ वर्षीय मुलाने खवड्या डोंगरावरून १०० फूट उंचीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, शनिवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. ही घटना वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगाव शिवारात घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अथर्व गोपाल तायडे (वय १६, रा. गल्ली क्र. ४, स्वस्तिक सिटी, तिसगाव, वाळूज एमआयडीसी, मूळ रा. रामदेवनगर, जळगाव जामोद, जि. बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अथर्व ११ वीत शिक्षण घेत होता आणि पोलीस भरतीसाठी तयारी करत होता.
अथर्वकडे जुना मोबाईल होता. मात्र, तो सतत नवीन मोबाईलसाठी आईकडे हट्ट करत होता. काही वेळापूर्वी त्याने पुन्हा मोबाईल मागितला असता, आईने नकार दिला. या कारणावरून तो रागाच्या भरात घराबाहेर पडला. त्याच्या मागे धावतच आईदेखील बाहेर पडली, मात्र अथर्वने थेट तिसगाव शिवारातील खवड्या डोंगरावर जाऊन सुमारे १०० फूट उंचीवरून उडी घेतली.
घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अथर्वला घाटी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
घटनेमुळे तायडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, त्याच्या आईचा घटनास्थळी फोडलेला हंबरडा हृदय हेलावून टाकणारा होता. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*