छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरात बनावट नोटा छपाई करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून अहिल्यानगर पोलिसांनी कारवाई करत तब्बल ५९ लाख ५० हजारांच्या बनावट नोटा, २७ लाख ९० हजारांची मशिनरी, शाई, कागद आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार अंबादास ससाणे हा अद्याप फरार आहे.

अहिल्यानगर पोलिसांना काही दिवसांपूर्वी रुईछत्तीसी परिसरात ८० हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. तपासादरम्यान या नोटांचा संबंध छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील काही व्यक्तींशी असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी सखोल तपास करून बनावट नोटांचा कारखाना वाळूज एमआयडीसीत सुरू असल्याचा सुगावा लावला.

या कारवाईत निखिल शिवाजी गांगर्डे (२७, कुंभळी, ता. कर्जत) आणि सोमनाथ माणिक शिंदे (२५, अहिल्यानगर) या दोघांना सुरुवातीला अटक करण्यात आली. चौकशीत या बनावट नोटा बीडमधील प्रदीप संजय कापरे (२८, तिंतरवणी, ता. शिरूर कासार) याच्याकडून मिळाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर प्रदीपला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता वाळूज एमआयडीसीमधून मोठ्या प्रमाणावर बनावट नोटांची छपाई सुरू असल्याचे उघड झाले.

त्यानंतर पोलिसांनी मंगेश पंढरी शिरसाठ (४०, शिवाजीनगर), विनोद दामोदर अरबट (५३, सातारा परिसर), आकाश प्रकाश बनसोडे (२७, निसर्ग कॉलनी, पेठेनगर) आणि अनिल सुधाकर पवार (३४, मुकुंदनगर) यांना ताब्यात घेतले. या सर्वांनी बनावट नोटा छपाई, कटिंग, पॅकिंग आणि वितरण या प्रक्रियेत सहभाग घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

या रॅकेटचा मास्टरमाइंड अंबादास रामभाऊ ससाणे (रा. शहर टाकळी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) हा असून तो २०२१ पासून बनावट नोटा छपाईचा व्यवसाय करतो आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ससाणेने भाड्याने घेतलेली जागा, वाहने, आणि बँक खाती आपल्या साथीदार मंगेश शिरसाठ यांच्या नावावर ठेवून स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता. छपाईसाठी लागणारी शाई व कागद हे भोपाळहून मागवले जात होते.

या प्रकरणात अजूनही काही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून छत्रपती संभाजीनगर, बीड आणि परिसरातील चलनात फिरणाऱ्या बनावट नोटांचा मागोवा घेण्याचे कामही सुरू आहे. ही कारवाई म्हणजे बनावट चलन रॅकेटवर मोठा आघात मानली जात असून यामध्ये आणखी मोठा नेटवर्क समोर येण्याची शक्यता आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,161 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क