छत्रपती संभाजीनगर : पत्नीच्या हट्टावरून मालेगावचा कौटुंबिक व्यवसाय सोडून शहरात स्थायिक झालेल्या इसमाने अतिरिक्त उत्पन्नासाठी चक्क दुचाकी चोरीचा मार्ग अवलंबला. गुन्हे शाखेने अटक केलेल्या अताऊर रहेमान निसार अहमद अन्सारी (४०, रा. सिटी चौक) याच्याकडून दुचाकी चोरीचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत.
घाटी रुग्णालयाच्या पार्किंगमधील दुचाकी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार आणि उपनिरीक्षक विशाल बोडखे यांनी तपास सुरू करून आरोपीचा माग काढला. सिटी चौकातील रुग्णालयाजवळ तो दिसून आला. मात्र पथक त्याच्या घरापर्यंत पोहोचण्याआधीच तो मालेगावला निघून गेला होता. अखेर बोडखे, योगेश गुप्ता, संतोष भानुसे, विजय घुगे, विक्रम खंडागळे, जालिंदर गोरे आणि सोमनाथ दुकले यांनी मालेगावमध्ये जाऊन त्याला बेड्या ठोकल्या.
अताऊरचा मूळ व्यवसाय टेलरिंगचा होता. मात्र विवाहानंतर पत्नीच्या आग्रहामुळे तो शहरात आला. पत्नी रुग्णालयात काम करत असल्याने घर चालत होते, पण टेलरिंगमध्ये हवे तसे उत्पन्न मिळत नव्हते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मित्रांच्या संगतीत येऊन त्याने आठ महिन्यांपूर्वी पहिली दुचाकी चोरली. त्यानंतर त्याची हिम्मत वाढली आणि त्याने नियमितपणे चोरी सुरू केली.
आठ महिन्यांत घाटी परिसर व शहरातील बारसमोरून त्याने सात दुचाकी चोरल्या. काही विकल्या, तर काही मालेगावला नेऊन ठेवल्या. त्याची पद्धत विशेष होती. बारमध्ये ग्राहक दारू पिण्यासाठी आत जाताच तो बाहेर उभ्या दुचाकीची रेकी करत असे. ग्राहक आत गुंतल्याची खात्री पटताच बनावट चावीच्या सहाय्याने दुचाकी चोरून नेई. तसेच घाटीत दुचाकीधारक रुग्णालयात आत शिरताच तो त्याचा फायदा घेत असे.
अधिक उत्पन्नाच्या हव्यासापोटी अताऊरने दुचाकी चोरीचा मार्ग स्वीकारला, मात्र गुन्हे शाखेच्या दक्ष तपासामुळे त्याचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी त्याच्याकडून काही दुचाकी जप्त केल्या असून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*