छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एकदा सायबर भामट्यांनी धक्कादायक कारनामा करत महावितरणच्या निवृत्त अधिकाऱ्याकडून तब्बल ४६ लाख रुपये उकळले आहेत. हा प्रकार ४ ते ११ ऑगस्टदरम्यान शहानूरवाडी भागात घडला.
७२ वर्षीय निवृत्त अधिकारी हे शहानूरवाडीत एकटे राहत होते. ४ ऑगस्टला त्यांना व्हॉट्सअॅपवरून व्हिडिओ कॉल आला. “मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय. तुम्ही माझ्या नावाने कॅनरा बँकेत खाते उघडून अडीच कोटींचा घोटाळा केला आहे,” अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर वृद्धाला एफडी सरेंडर करून दिलेल्या खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले गेले. घाबरलेल्या वृद्धाने सुरुवातीला हरियाणातील एका खात्यावर ४ आणि १० लाख असे दोन हप्त्यांत पैसे पाठवले. त्यानंतर भामट्यांनी पुन्हा कॉल करून ईडी वारंट व फोटो वॉरंट दाखवत आणखी पैसे भरण्यास सांगितले. शेवटी वृद्धाने सुबरजित मिश्रा नावाच्या व्यक्तीच्या खात्यात ३२ लाख रुपये आरटीजीएसने भरले. अशा तिन्ही व्यवहारांत मिळून ४६ लाख रुपये भामट्यांच्या खात्यात जमा झाले.
दरम्यान, चौकशी पूर्ण झाल्यानंतर पैसे परत मिळतील, पोलिसात किंवा बँकेत गेला तर ९० दिवसांची जेल होईल, घर व मोबाईल सील केले जातील, अशा धमक्या देण्यात आल्या. या व्हिडिओ कॉलमध्ये संदीप रॉय व राहुलकुमार शर्मा नावाचे कथित अधिकारी देखील सहभागी असल्याचे वृद्धाने सांगितले.
फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर पीडिताने सायबर पोर्टलवर तक्रार दाखल केली. त्यानंतर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास पोलिस निरीक्षक सचिन कुंभार करत आहेत.
विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वीच याच पद्धतीने आणखी एका वृद्धाची ७८ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाली होती. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांनी कोणत्याही अनोळखी कॉलवर विश्वास न ठेवता त्वरित पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*