छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात विमानाने प्रवास करून, आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम करत घरफोड्या करणारा कुख्यात आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील अनिल मिस्त्री राजवर (वय 38) याला गुन्हे शाखेच्या पथकाने चिकलठाणा येथील घरफोडी प्रकरणात बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चिकलठाणा भागातील आकाश देऊळगावकर यांच्या घराची कडी तोडून आरोपीने नऊ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. तपासादरम्यान आरोपीबाबत ठोस धागेदोरे मिळत नसल्याने देऊळगावकर कुटुंबीयांनी सोने परत मिळेल याची आशाच सोडून दिली होती. या प्रकरणात तब्बल चार तपास अधिकारी बदलल्यानंतर शेवटी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झाला. फुटेजमधील व्यक्ती हा अनिल राजवर असल्याचे स्पष्ट झाले, मात्र त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्या पथकाला तपासाची जबाबदारी देण्यात आली. दरम्यान, सोलापूर पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती मिळताच वाघ यांनी तात्काळ पथकासह सोलापूर गाठले. तेथे जामीन प्रक्रियेदरम्यानच कागदपत्रे पूर्ण होण्यापूर्वी पोलिसांनी राजवरला ताब्यात घेतले. या कारवाईत अमलदार सुनील जाधव, सोमकांत भालेराव, विजय निकम, कृष्णा गायके आणि नवनाथ खांडेकर यांनी सहभाग नोंदवला.
तपासात उघड झाले की अनिल राजवरने चिकलठाण्यातील चोरीतील नऊ तोळे सोनं मुंबईतील साकीनाका रोडवरील रोनक योगेश सिंघवी आणि ललित बाबूलाल सिंघवी या व्यावसायिकांना विकले होते. पोलिसांनी नोटीस दिल्यानंतरही त्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. अखेर त्यांना सहआरोपी करून अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी सोन्याची खरेदी केल्याचे मान्य केले.
विशेष म्हणजे, अनिल राजवर हा विमानाने प्रवास करून विविध शहरांत पोहोचत असे आणि तिथे आलिशान हॉटेलमध्ये राहून घरफोड्या करत असे. तो कोणाच्याही मदतीशिवाय एकटाच गुन्हा करत असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. सध्या त्याच्यावर राज्यात तब्बल 38 गुन्हे दाखल असून, त्याची ही थाटामाटातली गुन्हेगिरी पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होती.
👉 अखेर पोलिसांच्या दक्षतेमुळे कुख्यात राजवरला पकडण्यात यश आले असून, चोरी गेलेले दागिने परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*