छत्रपती संभाजीनगर : शहरातील जाधववाडी सिग्नल परिसरात एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशीनला लक्ष्य करून चोरट्यांनी मोठा डाव आखला होता. मंगळवारी (९ सप्टेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. तब्बल वीस मिनिटे चोरट्यांनी ग्रँडरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँकेच्या अत्याधुनिक सर्विलन्स सिस्टीममुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.
फिर्यादी एटीएम ऑफिसर नितीन वाघमारे (३४) यांच्या तक्रारीनुसार, चोरट्यांनी सर्वप्रथम मशीनचा व्हॉल्ट तोडत प्रवेश मिळवला. त्यानंतर ग्रँडरच्या सहाय्याने एटीएम उघडण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, मुंबईतील सर्विलन्स सेंटरला याची माहिती मिळताच तिथून एटीएमवरील स्पीकरद्वारे चोरट्यांना विचारणा सुरू झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या चोरट्यांनी स्पीकर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि मशीनची तोडफोड केली. ही हालचाल पहाटे ३.१८ ते ३.३८ या कालावधीत सुरू होती.
दरम्यान, पोलिसांना माहिती मिळून घटनास्थळी पोहोचण्यासाठी चार वाजेपर्यंत वेळ लागल्याचे समोर आले आहे. तोवर चोरटे पसार झाले होते. त्यामुळे सक्षम सर्विलन्स व्यवस्था असतानाही पोलिस गस्तीतील त्रुटी उघडकीस आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल मधुकर गोरे करीत आहेत.
या घटनेनंतर एटीएम केंद्रांची सुरक्षा, रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त आणि तांत्रिक उपकरणांचा वापर कितपत प्रभावी आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बँकांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे चोरी टळली असली तरी स्थानिक पातळीवरची पोलिसांची कारवाई वेळेत होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.
👉 एकूणच, एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला असला तरी या घटनेने पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उभे केले आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*