छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियाच्या आभासी जगाने आजच्या तरुणाईवर मोठा प्रभाव निर्माण केला आहे. या आभासी आकर्षणाने आता अल्पवयीन मुलांनाही आपल्याकडे ओढले आहे. अशाच प्रकारात छत्रपती संभाजीनगरातील अवघ्या १३ वर्षीय मुलगी इन्स्टाग्रामवरील प्रेमाच्या जाळ्यात अडकून गुजरातला पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड वर्षांच्या शोधानंतर अखेर पोलिसांनी ही मुलगी व तिचा प्रियकर आकाश या दोघांना ताब्यात घेतले असून, मुलीला तिच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मुकुंदवाडी परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील समीक्षा (नाव बदलले आहे) शाळेत शिकत होती. तिचे पालक खासगी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आईच्या मोबाइलवर इन्स्टाग्राम वापरताना समीक्षाची गुजरातमधील आकाश नावाच्या मुलासोबत ओळख झाली. आकर्षक फोटो आणि प्रभावी बोलण्याच्या जोरावर आकाशने समीक्षाला आपल्या प्रेमात ओढले. हळूहळू त्यांच्या चॅटिंग आणि कॉल्स वाढत गेले, आणि समीक्षाने घरच्यांना काहीही न सांगता ६ जानेवारी २०२४ रोजी घर सोडले.
त्या रात्री ती खासगी ट्रॅव्हल्सने सुरतला पोहोचली आणि थेट आकाशच्या घरी गेली. परंतु, तिथे पोहोचल्यावर तिला धक्काच बसला. आकाशचे वास्तव अत्यंत दारिद्र्यपूर्ण होते. तो एका छोट्या चाळीत राहत होता आणि एका कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. त्याचे आई-वडीलही वारलेले होते. पण पळून आल्याने समीक्षा परत जाण्याचे धाडस करू शकली नाही. त्यामुळे तिने आकाशसोबतच राहण्याचा निर्णय घेतला.
समीक्षेच्या घरच्यांनी तिच्या बेपत्तेपणाची तक्रार मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून शोधमोहीम सुरू केली, मात्र काहीच धागादोरे लागले नाहीत. तीन महिन्यांनंतर हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्यात आला. विभागातील सहायक निरीक्षक जयश्री कुलकर्णी, तसेच अंमलदार विठ्ठल मानकापे, हिरा चिंचोळकर, पुनम परदेशी, रामदास गव्हाणे यांनी सातत्याने या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला.
दरम्यान, समीक्षेला कुटुंबाची ओढ लागल्याने तिने निनावी नावाने इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले आणि आपल्या भावाशी संपर्क साधला. ती सातत्याने त्याला पालकांविषयी विचारत असल्याने भावाला संशय आला. त्याने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू करून तिच्या प्रोफाइलवर पाळत ठेवली आणि खात्री पटवली की तो निनावी अकाउंट समीक्षाचं आहे.
२३ ऑक्टोबर रोजी भाऊबीजेनिमित्त समीक्षा आणि आकाश शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथकाने तत्काळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत समीक्षेने सर्व प्रकार उघड केला. तिच्या कुटुंबियांनी अश्रू ढाळत तिला मिठी मारली, तर पोलिसांच्या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या घटनेतून पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या आभासी जगाचे दुष्परिणाम समोर आले आहेत. मुलांच्या मोबाईल वापरावर पालकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज असल्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*