शहाबाजारात वर्चस्वाच्या वादातून तरुणावर तलवारीने सपासप वार करून खून; काही तासातच आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर :  वर्चस्ववादातून आणि तीन दिवसांपूर्वी झालेल्या चाकूहल्ल्याच्या बदल्यात एका टोळक्याने तरुणावर भररस्त्यात तलवारीने सपासप वार करून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.३१) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास शहाबाजार, सिटीझन हॉस्पिटलसमोर घडली. या हल्ल्यात समीर खान इनायत खान (३०, रा. काचीवाडा, शहाबाजार) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

हल्ल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी चार आरोपींना जेरबंद केले असून, पाचवा आरोपी अद्याप फरार आहे. अटक झालेल्यांमध्ये शोएब अन्वर खान (२१), इसरार खान निसार खान (२३, दोघे रा. राहत कॉलनी, पंचायत समितीमागे), मोहम्मद नासेर मोहम्मद फारुख ऊर्फ इंता (३२, रा. रशीदपुरा) आणि इस्लाम खान खमर खान ऊर्फ असलम चाऊस (२७, रा. शहागंज भाजी मंडई) यांचा समावेश आहे. तर आसिफ रायडर हा फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले.

फिर्यादी सना कौसर समीर खान (२५) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिचा पती समीर खान हा भाजीविक्रीचा व्यवसाय करत होता. मंगळवारी (दि.२८) शोएबने समीर आणि इतरांवर चाकूहल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बुधवारी सना आणि समीर यांनी प्रत्युत्तरादाखल तक्रार दिली होती. त्यात आरोपी आसिफ, हाफिज ऊर्फ टकला आणि शोएब काला यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद केले होते. या वादातूनच बदला घेण्यासाठी ही हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

शुक्रवारी सायंकाळी समीर निशान दर्गा परिसरात मित्राला भेटण्यासाठी गेला असता, आरोपींनी आधीपासूनच पाळत ठेवून त्याच्यावर हल्ला चढवला. दुचाकीवर बसलेल्या समीरवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चौघांनी तलवारीने गळा, मान, हात, पाय आणि डोक्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात समीर कोसळला तरीही आरोपींनी वार सुरूच ठेवले आणि त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ, डीसीपी पंकज अतुलकर, एसीपी सागर देशमुख, निरीक्षक गजानन कल्याणकर, सुनील माने, एपीआय मनोज शिंदे, पीएसआय भागवत मुठाळ आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. गुन्हे शाखा आणि सिटी चौक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत काही तासांतच चौघा आरोपींना अटक करण्यात आली असून, फरार आरोपी आसिफ रायडरचा शोध सुरू आहे. अधिक तपास एपीआय मनोज शिंदे करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,755 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क