छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावरील वर्क फ्रॉम होमच्या आकर्षक जाहिरातींवर विश्वास ठेवणे एका व्यावसायिक तरुणीला महागात पडले. इंस्टाग्रामवरील फसव्या लिंकवर क्लिक केल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी तिला कामाच्या बदल्यात दामदुप्पट परतावा मिळेल, असे सांगत दोन दिवसांत तब्बल १ लाख ७६ हजार रुपये उकळले. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्सूल परिसरात राहणारी ही तरुणी सूतगिरणी चौकात व्यवसाय करते. २४ ऑक्टोबर रोजी ती इंस्टाग्रामवर रिल्स पाहत असताना वर्क फ्रॉम होमची जाहिरात दिसली. त्यात देशभरातील हॉटेल्सना ऑनलाईन रेटिंग देऊन घरबसल्या दिवसाला ५ ते ८ हजार रुपये कमावण्याचे आमिष दाखवले होते. जाहिरात विश्वासार्ह वाटल्याने तिने दिलेल्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर गुन्हेगारांनी तिला हॉटेलचे पेज ओपन करून रेटिंग देण्यास व त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवण्यास सांगितले.
तिने सांगितलेले काम केल्यानंतर तिच्या खात्यात १८० रुपये जमा झाले. त्यामुळे तिचा विश्वास अधिकच बसला. काही वेळातच धरणी गोखले नामक व्यक्तीने पुन्हा ८ ‘टास्क’ देत ११ हजार रुपये भरल्यास दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवले. तिने लगेच रक्कम पाठवली. त्यानंतर आरोपींनी टेलिग्राम अॅपद्वारे सतत संपर्क ठेवून अनिषा टापा नामक दुसऱ्या व्यक्तीद्वारे १ लाख ६५ हजार रुपये भरल्यास २ लाख २९ हजार रुपये मिळतील असे सांगितले. परंतु पैसे पाठवूनही एकही रुपया मिळाला नाही.
टेलिग्रामवर सतत पैशांची मागणी सुरू झाल्याने तरुणीला आपण फसलो गेल्याचे लक्षात आले. अखेर तिने हर्सूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*