छत्रपती संभाजीनगर : काकड आरतीसाठी मोहटा देवी मंदिराकडे चाललेल्या एका वृद्ध महिलेला दुचाकीवर आलेल्या तिघा अज्ञात चोरट्यांनी मारहाण करून तिच्याकडील मोबाइल फोन आणि सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास गारखेडा परिसरातील मोहटा देवी मंदिराजवळ घडली.
या प्रकरणात गारखेडा परिसरातील मल्हार चौक येथे राहणाऱ्या ६६ वर्षीय महिलेनं पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी या दररोजप्रमाणे पहाटे पाच वाजता काकड आरतीसाठी मोहटा देवी मंदिराकडे चालत होत्या. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी त्यांना अडवले. अचानक हल्ला करत त्यांनी महिलेला मारहाण केली आणि तिच्याकडील एक मोबाइल फोन तसेच सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला.
फिर्यादींच्या मते, आरोपींनी सुमारे आठ हजार रुपयांच्या ऐवजावर हात साफ केला. त्यामध्ये पाच हजार किंमतीच्या सोन्याच्या मण्यांची पोत, तसेच अडीच हजार रुपये किंमतीचे कानातील कुडके असा ऐवज समाविष्ट आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेनं तत्काळ पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
दरम्यान, ही संपूर्ण घटना जवळच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये वृद्ध महिला रस्त्याने चालताना आणि काही अंतरावर दुचाकीवर आलेले तिघे तिच्यावर हल्ला करताना दिसत आहेत. त्यापैकी एकजण महिलेला धमकावताना तर दुसरा तिच्याकडील दागिने हिसकावताना स्पष्टपणे आढळतो.
पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*