छत्रपती संभाजीनगर : कान दुखत असल्याने घाटी रुग्णालयात जाऊन येते, असे सांगून घरातून गेलेल्या 50 वर्षीय महिलेचा मृतदेह दुसऱ्याच दिवशी रस्त्याच्या कडेला धारदार शस्त्राच्या जखमांसह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ओळखीच्या व्यक्तीला अटक केली असून वैयक्तिक वादातूनच हा खून केल्याची आरोपीने कबुली दिली आहे. ही घटना करमाड परिसरातील अंजनडोह शिवारात उघडकीस आली.
मृत महिलेचे नाव कांताबाई अनिल सोमदे (वय 51, रा. आडगाव सरक, ता. छत्रपती संभाजीनगर) असे आहे. अटक करण्यात आलेला आरोपी मारुती नामदेव भुईगळ (वय 50, रा. धानोरा, ता. सिल्लोड) हा मृत महिलेचा परिचित असून दोघांमध्ये वैयक्तिक कारणावरून वाद झाला होता, असे पोलिस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 ऑक्टोबर रोजी सकाळी कांताबाई यांनी कान दुखत असल्याचे सांगून घाटी रुग्णालयात जाण्याचे सांगून घर सोडले. सकाळी 11 वाजता कुटुंबीयांनी फोन करून विचारणा केली असता त्यांनी ‘रुग्णालयात औषध घेण्यासाठी रांगेत उभे आहे’ असे सांगितले. त्यानंतर त्यांचा फोन बंद आला आणि त्या बेपत्ता झाल्या.
दुसऱ्या दिवशी, म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी, करमाड हद्दीतील अंजनडोह शिवारात रस्त्याच्या कडेला एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी ओळख पटवली असता ती कांताबाई सोमदे असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राचे अनेक व्रण होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातून उघड झाले की, महिला बेपत्ता झाली त्या दिवशी आरोपी मारुती भुईगळ दिवसभर तिच्यासोबत होता. वाद झाल्यानंतर त्याने धारदार शस्त्राने तिचा खून करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. पोलिसांनी तत्काळ तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या.
या कारवाईत पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पवन इंगळे, संतोष मिसाळ, सुधीर मोटे, उपनिरीक्षक महेश घुगे व सम्राटसिंग राजपूत यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*