छत्रपती संभाजीनगर : प्रेमासाठी तरुण-तरुणी अनेकदा वेडेवाकडे निर्णय घेतात. मात्र, शहरात उघडकीस आलेल्या एका घटनेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रेयसीवर खर्च करण्यासाठी एका बीएच्या विद्यार्थ्याने तब्बल १४ दुचाकी चोरी केल्याचे समोर आले असून पोलिसांनी तिघांना अटक करून सर्व दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती अशी की, समर्थ विनोद काळे हा बीएचा विद्यार्थी प्रेयसीवर पैसे उधळण्याची सवय जडल्याने आर्थिक अडचणीत आला होता. पैशाची तरतूद करण्यासाठी त्याने गुन्हेगारांची साथ पकडली. नशेच्या आहारी गेलेल्या समर्थने पवन परमेश्वर चौधरी आणि सोहेल शैकद बेग यांच्यासोबत मैत्री करून पाच महिन्यांत विविध भागातून दुचाकी चोरी करण्याचे ‘धडे’ घेतले. त्यानंतर त्रिकुटाने १४ दुचाकी चोरी करून त्यातील पैसे प्रेयसीवर खर्च केला तसेच नशापाणीवरही उधळले.

जवाहरनगर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता या रॅकेटचा भांडाफोड झाला. चौकशीत पवन आणि समर्थने चोरलेल्या दुचाकी सोहेलला विक्रीसाठी देत असल्याचे कबूल केले. पुढे सोहेल १५ ते २५ हजार रुपयांत दुचाकी खरेदी करून ६० हजारांपर्यंत विक्री करत असे. विशेष म्हणजे, आरटीओमधून दुचाकींच्या कागदपत्रांची झेरॉक्स मिळवून पुढील विक्री सुलभ केली जात होती. या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिसही हादरून गेले आहेत.

पोलिसांनी तिघांना अटक करत सर्व १४ दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपींकडून आणखी कोणत्या गुन्ह्यांचा तपास लागतो का, याबाबत चौकशी सुरू आहे. शहरात वाढत्या अशा गुन्ह्यांमुळे युवकांनी मार्गभ्रष्ट होण्याच्या घटना चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईनंतर परिसरात चर्चा रंगली असून प्रेमासाठी गुन्ह्यांच्या वाटेवर जाण्याच्या घटनांवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,517 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क