छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा सायबर गुन्ह्याने धक्कादायक स्वरूप घेतले आहे. कोणताही मेसेज किंवा ओटीपी न मिळाल्यानंतरही एका हॉटेल व्यावसायिकाच्या खात्यातून तब्बल १० लाख २३ हजार ४६४ रुपये परस्पर काढून घेण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आयएमपीएसद्वारे करण्यात आलेल्या ९ व्यवहारांमधून ही रक्कम १५ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये व क्रेडिट कार्ड धारकांच्या खात्यात वळती करण्यात आली. रविवारी हा प्रकार घडल्याने तक्रार नोंदविणेही शक्य झाले नाही. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शशिकांत दत्तूराव वाघ (४५, रा. म्हाडा कॉलनी, विमानतळाजवळ) हे स्थानिक हॉटेल व्यवसायिक असून त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या चिकलठाणा शाखेत खाते ठेवले आहे. त्यांनी फोन पे द्वारे पैसे स्वीकारण्याची सुविधा घेतली असली तरी बँकेची कोणतीही ऑनलाइन रक्कम ट्रान्सफर सुविधा त्यांनी कधीच सुरू केली नव्हती. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता त्यांच्या मोबाईलवर सलग अनेक मेसेज येऊ लागले. त्यांच्या खात्यातून वेगवेगळ्या पद्धतीने नऊ व्यवहार करीत लाखोंची रक्कम वळती झाल्याचे मेसेज पाहून ते अवाक झाले. मात्र रविवार असल्याने बँकेत तात्काळ भेट देता न आल्याने त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ नोव्हेंबरला ते बँकेत गेले असता व्यवस्थापकांनी लीगल टीम तपास करत असल्याचे सांगून टाळाटाळ केली. एमआयडीसी सिडको ठाण्यात त्यांनी माहिती घेतली असता व्यवहार प्रलंबित असल्याची माहिती मिळाली. परंतु पुन्हा बँकेत गेल्यावर त्यांना कोणतीही ठोस माहिती देण्यात आली नाही.
तपासात उघड झाले की वाघ यांच्या खात्यातील रक्कम १५ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये व क्रेडिट कार्डमध्ये वळती करण्यात आली. मात्र हे व्यवहार कसे झाले, कोणत्या माध्यमातून झाले याबाबत बँक किंवा संबंधितांकडून कोणतीही स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीता बागवडे करीत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*