छत्रपती संभाजीनगर : पतीने पत्नी आणि तिच्या मित्राविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यातील महिला हवालदार लता बाळासाहेब दराडे (३७, रा. अॅमरॉड सिटी, गारखेडा) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई २७ नोव्हेंबर रोजी दराडे यांच्या गारखेड्यातील घरी करण्यात आली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबी अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने आणि तिच्या मित्र राहुलने याप्रकरणी एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदार महिलेच्या पतीने दोघांविरुद्ध दौलताबाद ठाण्यात अर्ज दिला होता. त्याची चौकशी हवालदार दराडे यांच्याकडे होती. कारवाई न करण्यासाठी तिने दोघांकडे प्रत्येकी १० हजार रुपये, असे एकूण २० हजारांची लाच मागितली. तक्रारदारांनी लाच देण्यास नकार देत एसीबीकडे धाव घेतली. पडताळणीदरम्यान लाच मागणीची खात्री झाली.

२७ नोव्हेंबरला तक्रारदार महिला आणि तिचा मित्र ठाण्यात गेले असता दराडे उपस्थित नव्हत्या. फोनवरून त्यांनी तक्रारदारांना बाबा पेट्रोल पंप चौकात बोलावले. त्यानंतर शिवाजीनगर आणि अखेर स्वतःच्या घरी येण्यास सांगितले. तक्रारदारांनी ठरलेली रक्कम दिल्यानंतर बाहेर पडताच डोके खाजविण्याचा सिग्नल देण्यात आला आणि एसीबीच्या पथकाने तत्काळ घरात घुसून दराडे यांना अटक केली.

दराडे या एका निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांच्या सून असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लाच घेताना त्यांची मुले घरातच उपस्थित होती. काही वेळाने पती घरी परतल्यानंतर घराची झडती घेण्यात आली. या कारवाईत उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, संगीता पाटील, हवालदार दीपक इंगळे, सचिन बारसे, राम गोरे आणि सी. एन. बागुल यांच्या पथकाने सहभाग घेतला. एसीबीच्या या कारवाईमुळे पोलीस दलातील भ्रष्टाचाराविरुद्धचा संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,223 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क