छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, फुलंब्री, कन्नड व वैजापूर तालुक्यांत सोमवारी दुपारनंतर आणि सायंकाळी अवकाळी पावसाने व गारपिटीने अक्षरशः थैमान घातले. विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या या पावसामुळे ऐन काढणीच्या हंगामात उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे.

पैठण तालुक्यातील पाटेगाव, आपेगाव, पाचोड, बालानगर व रांजणगाव खुरी परिसरात सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. यामुळे काढणीस आलेला गहू, ज्वारी, हरभरा आणि कांदा पिके जमीनदोस्त झाली. मोसंबी व आंबा बागांना ६० टक्क्यांहून अधिक फटका बसून मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. आपेगाव येथे ५० वर्षे जुने वडाचे झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

सोयगाव तालुक्यात बनोटी व जरंडी महसूल मंडळातील गावांमध्ये गारपिटीने पिकांची नासधूस केली. सिल्लोड तालुक्यातील केन्हाळा येथे वीज पडून तीन शेळ्या ठार झाल्या, तर अंभई येथे गाभण म्हैस दगावली. केळगाव परिसरात विजेमुळे चाऱ्याची गंजी जळून खाक झाली. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी व करंजखेड येथे गेल्या १२ दिवसांतील दुसऱ्यांदा असे संकट ओढवले आहे.

गंगापूर शहरात रात्री झालेल्या पावसामुळे काढणीला आलेला गहू भिजला, तर बाजार सावंगी परिसरात वीस मिनिटांच्या पावसाने गहू, हरभरा, मका व कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. करमाड व परिसरातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. द्राक्ष, आंबा व डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, १८ व १९ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नसताना पुन्हा आलेल्या या संकटामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. “हातातोंडाशी आलेला घास हिरावला,” अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तास सतर्कतेचा इशारा दिल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

474 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क