छत्रपती संभाजीनगर : मानवी आरोग्यास घातक आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘कफ सिरप’ची बेकायदेशीर साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका टोळीचा शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. बीड बायपास परिसरातील अबरार कॉलनी येथे टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी शेख आवेज शेख नवाब, सय्यद अखिल सय्यद काझी हुसैनी आणि शेख अरबाज शेख फिरोज या तिघांना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या नशेच्या बाजाराचे गुजरात कनेक्शन उघडकीस आले आहे.

बीड बायपास भागातील अबरार कॉलनीमध्ये काही तरुण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपची बेकायदेशीर विक्री करत असल्याची गुप्त माहिती दिनांक ६ एप्रिल रोजी गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने अबरार कॉलनीत छापा टाकला. यावेळी घरातून ‘CODYLINE COUGH SYRUP’ च्या तब्बल १९० सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. एका बाटलीची किंमत अंदाजे ४०० रुपये असून हा ७६ हजार रुपयांचा साठा आणि २० हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल औषध निरीक्षकांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आला.

या कारवाईत पोलिसांनी शेख आवेज शेख नवाब आणि सय्यद अखिल सय्यद काझी हुसैनी (दोघेही रा. सिल्क मिल कॉलनी) तसेच शेख अरबाज शेख फिरोज (रा. अबरार कॉलनी) या तीन आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी हा माल गुजरातमधील अहमदाबाद येथील अदनान कापडिया याच्याकडून आणल्याची कबुली दिली. यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारे नशेचा माल विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपी अदनान कापडिया याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शर्मिष्ठा घारगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, सपोनि संदीप काळे, सपोनि अर्जुन कदम आणि त्यांच्या पथकाने केली.

 

पोलिसांचे आवाहन:

शहरात कुठेही अवैध नशेच्या पदार्थांची विक्री होत असल्यास नागरिकांनी ‘डायल ११२’ किंवा मोबाईल क्रमांक ९२२६५१४००१ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

685 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क