छत्रपती संभाजीनगर : शासकीय रुग्णालयात मोफत होणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी लाच मागितल्याप्रकरणी बिडकीन ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय दळवी यांच्यासह एका सफाई कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. अवघ्या बाराशे रुपयांच्या लाचेसाठी ‘क्लास वन’ अधिकाऱ्याने स्वतःचा आब गमावल्याची चर्चा आरोग्य विभागात रंगली आहे.
तक्रारदाराच्या बहिणीची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी ते बिडकीन ग्रामीण रुग्णालयात गेले होते. ५ एप्रिल रोजी त्यांनी डॉ. दळवी यांच्याशी संपर्क साधला असता, शस्त्रक्रियेसाठी ६ हजार रुपयांची लाच मागण्यात आली. शासकीय रुग्णालयात ही सेवा मोफत असताना लाच मागितल्याने तक्रारदाराने ६ एप्रिल रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने तात्काळ पडताळणी केली. यात बाराशे रुपये लाच घेण्याचे निश्चित झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. शस्त्रक्रिया सुरू असतानाच बाहेर सफाई कर्मचारी नारायण ब्राह्मणे हा डॉ. दळवी यांच्यासाठी लाच स्वीकारत होता. तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे रक्कम दिल्यानंतर डाव्या हाताने रुमाल काढण्याचा इशारा केला. त्याच क्षणी एसीबीच्या पथकाने झडप घालत ब्राह्मणे याला पकडले आणि त्यानंतर डॉ. दळवी यांनाही अटक करण्यात आली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, संतोष तिगोटे, हवालदार इंगळे आणि युवराज हिवाळे यांनी सहभाग घेतला. प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, डॉ. विजय दळवी हे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असून अवघ्या तीन महिन्यांत निवृत्त होणार होते. उच्च पद, मोठा पगार आणि जबाबदारी असतानाही केवळ बाराशे रुपयांसाठी लाच घेताना अटक झाल्याने त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*