सिल्लोड : राज्य परिवहन महामंडळाच्या सिल्लोड आगारातील सहायक वाहतूक निरीक्षकाने वरिष्ठांकडून होत असलेल्या कथित मानसिक छळाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. शरद विठ्ठल भिवसने (वय ४०, रा. वैशालीनगर, सिल्लोड) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी डेपो मॅनेजरसह तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मृत शरद भिवसने यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डेपो मॅनेजर विजय काळवणे, वाहतूक निरीक्षक किरण अवसरमल आणि लिपिक विकास चव्हाण हे भिवसने यांना वारंवार मानसिक त्रास देत होते. त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून सतत बाहेर ड्युटी लावण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. या सततच्या छळामुळे ते मानसिकदृष्ट्या त्रस्त झाले होते आणि अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी नियमित ड्युटीवर गेलेले भिवसने दुपारी १२ वाजता ‘जेवायला जातो’ असे सांगून बाहेर पडले. त्यानंतर दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आर. एल. पार्क परिसरातील एका विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर एसटी कर्मचारी व नातेवाईक संतप्त झाले. दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत शहर पोलिस ठाण्यात मोठी गर्दी झाली. सहकाऱ्याच्या मृत्यूच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी सिल्लोड आगारातील बससेवा ठप्प केली, त्यामुळे ग्रामीण भागातील सुमारे २० बस फेऱ्या रद्द झाल्या. पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी रात्री उशिरा तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केल्याची माहिती दिली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*