छत्रपती संभाजीनगर: शहरातील छावणी परिसरातील भावसिंगपुरा येथे २३ वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ईश्वरी अजय बनकर असे या मृत विवाहितेचे नाव आहे. सासरच्या जाचातून तिने आत्महत्या केली नसून, पती व सासरच्या मंडळींनी तिचा खूनच केल्याचा गंभीर आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. आरोपींना जोपर्यंत बेड्या ठोकल्या जात नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेत नातेवाईकांनी घाटी रुग्णालयाच्या पोस्टमॉर्टम विभागासमोर आक्रोश करत ठिय्या मांडला होता. 

या वाढत्या तणावानंतर छावणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विवेक जाधव यांनी नातेवाईकांची समजूत काढली. पोलिसांनी या प्रकरणी पती अजय बनकर याच्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल केला असून, ७ जणांना तातडीने अटक केली आहे.

पैशांसाठी अमानुष छळ: 

मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वरीचा विवाह २८ जून २०२० रोजी सुपरवायझर असलेल्या अजय बनकर याच्याशी झाला होता. लग्नात ५ तोळे सोने आणि २ लाख रुपये देण्यात आले होते. पहिली तीन वर्षे चांगली गेल्यानंतर सासरच्यांनी श्रावस्ती कॉलनी आणि पडेगाव येथील प्लांटचे बांधकाम व हप्ते भरण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला. तक्रारीनुसार, पती अजयसह नणंद वैशाली मगरे, नंदोई विजय मगरे, दुसरी नणंद अश्विनी सदाफुले, महेश सदाफुले आणि इतर चुलत नातेवाईकांकडून पैशांसाठी तिचा सतत छळ सुरू होता. ६ एप्रिल रोजी जेवणात केस निघाल्याच्या क्षुल्लक कारणावरून अजयने तिला बेदम मारहाण केली होती आणि ‘पैसे आणले नाही तर तिकडेच मरून जा’ अशी धमकी दिली होती.

सकाळी आनंदी संवाद, दुपारी मृत्यूची बातमी: 

घटनेच्या दिवशी (९ एप्रिल) सकाळीच ईश्वरीने आपल्या आईशी फोनवर अगदी आनंदाने संवाद साधला होता. १४ एप्रिलला येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्वतःसाठी, आईसाठी आणि आपल्या तीन वर्षांच्या मुलीसाठी (त्रिशा) नवीन कपडे घेण्याबाबत ती उत्साहाने बोलत होती. मात्र, दुपारी सासरच्यांकडून ‘ईश्वरी फोन उचलत नाहीये’ असा निरोप आल्याने माहेरच्यांनी धाव घेतली. तेव्हा ती पलंगावर निपचित पडलेली आढळली.

या हृदयद्रावक घटनेमुळे तीन वर्षांच्या चिमुकल्या त्रिशाच्या डोक्यावरून मातृछत्र हरपले असून परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,233 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क