छत्रपती संभाजीनगर : जालना महामार्गावरील करमाड येथील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणीचा भरदिवसा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. ९) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला कचनेर येथून करमाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पूजा सुदाम गावंडे (वय २७, रा. चित्तेपिंपळगाव, ता. छत्रपती संभाजीनगर, सध्या मुक्काम कूंभेफळ) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती करमाड येथील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर कार्यरत होती. गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे काम सुरू असताना सत्यम रावसाहेब गावंडे (वय ३२, रा. चित्तेपिंपळगाव) हा दुचाकीवरून पेट्रोल पंपावर आला. त्याने अचानक धारदार चाकूने पूजाच्या गळ्यावर वार करत तिचा निर्घृण खून केला. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पूजाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. मात्र, या संपूर्ण घटनेचा प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असल्याने पोलिसांना तपासात महत्त्वाचा पुरावा मिळाला. प्राथमिक तपासात आरोपी हा मृत पूजाचा परिचित असून प्रेमसंबंधातील वादातून हा खून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध घेतला आणि कचनेर येथून त्याला ताब्यात घेतले. पुढील चौकशी सुरू असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*