Builder-Kunal-Bakliwal-Arrested-Again
छत्रपती संभाजीनगर : वाहतूक पोलिसांना अरेरावी करून धमकावणाऱ्या बांधकाम व्यावसायिक कुणाल दिलीप बाकलीवाल (३८, रा. बीड बायपास) याला अवघ्या बारा दिवसांत पुन्हा पोलिसांच्या कोठडीत जावे लागले आहे.
व्यावसायिकाची फसवणूक करून गुंडाकडून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा ठपका ठेवत सातारा पोलिसांनी त्याला शनिवारी रात्री अटक केली. अमित कासलीवाल (रा. श्रीकृष्णनगर, देवळाई) यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती.
फसवणूक आणि पैशांची उधारी नाकारली
५ नोव्हेंबर २०२२ रोजी बाकलीवालच्या घरी धार्मिक कार्यक्रमासाठी कासलीवाल यांनी अडीच हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. त्यासाठी १६ लाख रुपये देणे बाकी होते. मात्र, बाकलीवालने बिल देण्यास नकार दिला. कासलीवाल यांनी पैशांची मागणी केल्यावर बाकलीवाल त्यांना धमकावत होता.
९ डिसेंबर २०२४ रोजी बाकलीवालने कासलीवाल यांना घरी बोलावले आणि मुलीच्या वाढदिवसाचे काम केल्यास सर्व पैसे देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, १७ डिसेंबर रोजी कासलीवाल यांनी ९ लाख ७० हजार रुपयांचे काम पूर्ण केले. पण, बाकलीवालने तेही पैसे नाकारले.
बाराव्या मजल्यावर हल्ला
१२ जानेवारी रोजी बाकलीवालने कासलीवाल यांना कमलनयन बजाज रुग्णालयासमोरील एका अर्धवट इमारतीच्या बाराव्या मजल्यावर बोलावले. दुपारी ३ वाजता तेथे बाकलीवाल, त्याचा चालक, एक नोकर आणि सागर भानुशाली उपस्थित होते. त्यांनी कासलीवाल यांच्यावर हॉकी स्टीक, लाकडी दांडा आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केला.
यावेळी नोकराने कासलीवाल यांच्या गळ्यातील ३.२ तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून घेतली. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून अनेकांना पाठवण्यात आला. कासलीवाल यांना एका खोलीत तीन तास कोंडून ठेवण्यात आले. अखेर, त्यांच्या भावाने येऊन त्यांची सुटका केली.
“पोलिस माझे काहीच करू शकत नाहीत!”
या संपूर्ण घटनेत बाकलीवाल सातत्याने कासलीवाल यांना धमकावत होता आणि “पोलिस माझे काहीच करू शकत नाहीत,” असे म्हणत धाक दाखवत होता. यामुळे कासलीवाल आणि त्यांचे कुटुंब प्रचंड दहशतीत होते.
२४ जानेवारी रोजी वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घातल्यानंतर पोलिसांनी बाकलीवालला गुडघ्यावर बसवत अटक केली होती. त्यानंतर कासलीवाल यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि उपायुक्त नितीन बगाटे यांच्याकडे तक्रार केली.
उपायुक्त बगाटे यांनी शनिवारी सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताठे यांना कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून शनिवारी रात्री बाकलीवालला अटक केली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*
