गंगापुर : तालुक्यातील वरखेड शिवारात सोमवारी (३ मार्च) पहाटेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी औटे वस्तीवर दरोडा टाकला. या हल्ल्यात शेतकरी कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा सव्वा लाखाचा ऐवज लुटून पोबारा केला.
गट क्रमांक २१३ मध्ये अशोक भानुदास औटे (५५) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सोमवारी पहाटे ३:३० वाजता चार दरोडेखोरांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यांनी अशोक औटे, त्यांचा मुलगा गणेश औटे (४०), सून सोनाली औटे (३५) आणि नातू रुद्रा औटे (१४) यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर, चोरट्यांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत घरातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून सव्वा लाख रुपयांचा ऐवज लुटला.
मोबाईल हिसकावून फेकले, टरबूज पिकाची नासाडी
दरोडेखोरांनी कुटुंबाचे मोबाईल हिसकावून ते दूर शेतात फेकून दिले, जेणेकरून पोलिसांना त्वरित माहिती देता येऊ नये. इतकेच नव्हे, तर त्यांनी औटे कुटुंबाच्या शेतातील अर्धा एकर टरबूज पिकाची नासधूस केली. पहाटे झालेल्या या धक्कादायक घटनेनंतर सकाळी ६:३० वाजता अशोक औटे यांनी बाजूच्या शेतवस्तीवर जाऊन नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती दिली.
जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले अशोक औटे आणि त्यांचा मुलगा गणेश औटे यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी घटनास्थळी पाहणी केली. विशेष म्हणजे, याच रात्री दरोडेखोरांनी औटे वस्तीच्या शेजारील जंगले वस्तीवरील बंद घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथे कोणीही राहत नसल्याने त्यांना काहीच हाती लागले नाही.
या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*