छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या घटनांमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जोगेश्वरी येथे एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आली. हा प्रकार समजल्यानंतर संतप्त पालकांनी जाब विचारण्यासाठी गेले असता, आरोपींनी त्यांच्यावरच हल्ला केला. हाताने, लाकडी दांड्याने आणि लाथांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना बुधवारी (5 मार्च) सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमके काय घडले?
जोगेश्वरी येथे राहणारी 14 वर्षीय मुलगी आपल्या आई-वडील, भाऊ आणि बहिणीसोबत भाड्याच्या घरात राहते. तिचे आई-वडील खाजगी नोकरी करतात. मंगळवारी (4 मार्च) ती शाळेतून घरी परतत असताना निलेश दुबिले, ऋषिकेश दुबिले आणि प्रतीक राजूपत यांनी तिचा पाठलाग करत अश्लील हातवारे केले. घरी आल्यानंतर तिने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. तेव्हा आईने बाहेर येऊन पाहिले असता आरोपी पळून गेले.
बुधवारी (5 मार्च) सकाळी पाचच्या सुमारास मुलगी घराचा ओटा झाडत असताना आरोपी पुन्हा तिच्या घरासमोर आले आणि अश्लील प्रकार सुरू केला. आई-वडिलांनी जाब विचारताच आरोपींनी शिवीगाळ केली आणि हातातील लाकडी दांड्याने हल्ला चढवला. आईला छातीवर लाथ मारली, डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. वडिलांवरही हल्ला करण्यात आला.
साक्षीदारांनाही मारहाण
या घटनेला काही स्थानिकांनी विरोध केला. प्रविण डिगंबर काजळे, कृष्णा काजळे आणि सतिश काजळे यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी आणखी काही तरुण आरोपींसोबत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलीस कारवाई
या घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठा संताप पसरला आहे. 39 वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी निलेश दुबिले, ऋषिकेश दुबिले, प्रतीक राजूपत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, प्रतीक सतीश राजपूत, ऋषिकेश रामनाथ दुबिले, रोहित शंकरसिंग बहुरे, नीलेश रामनाथ दुबिले यांच्यावरही गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
🔴 महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला असून आरोपींवर कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे!
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*