kidnap-plot-foiled-aurangabad-kirana-shopkeeper-family-saved
छत्रपती संभाजीनगर : किराणा दुकानदार व त्याच्या दोन अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचा कट वाळूज एमआयडीसी पोलिसांनी रविवारी सायंकाळी उधळून लावला. उसनवारीच्या पैशाच्या वादातून पाच खासगी सावकारांनी हा कट रचला होता. मात्र, अपहृत व्यक्तीच्या १७ वर्षीय मुलीच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे कुटुंब सुखरूप राहिले.
छत्रपती संभाजीनगरमधील हनुमाननगर, मुकुंदवाडी भागात किराणा दुकान चालविणाऱ्या ३८ वर्षीय गृहस्थाने व्यवसाय विस्तारासाठी वैभव बिहारीलाल जैस्वाल व प्रशांत विलास डांगे या खासगी सावकारांकडून १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. काही दिवसांपूर्वीच हे गृहस्थ वाळूज महानगरात वास्तव्यास आले. रविवारी सायंकाळी वाळूजमध्ये या गृहस्थाचा शोध घेत अपहरणकर्ते दाखल झाले. त्यांनी घरात घुसून उसनवारीच्या पैशासाठी शिवीगाळ व धमक्या दिल्या. पैसे न दिल्यास ठार मारण्याची आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याची धमकीही दिली. त्यांनी गृहस्थ, त्याची १७ वर्षीय मुलगी व १३ वर्षांचा मुलगा यांना जबरदस्तीने कारमध्ये कोंबले. मात्र, १७ वर्षीय मोठी मुलगी त्यांच्या तावडीतून निसटली आणि जवळील मंदिरात लपली. या मुलीला रडताना पाहून एका सामाजिक कार्यकर्त्याने मदत केली व संपूर्ण प्रकार जाणून घेत तिला थेट वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेले. मुलीने पोलिसांना संपूर्ण घटना सांगताच पोलिसांनी तातडीने कार्यवाही सुरू केली.
पोलिस वेळेत आले नसते तर या गृहस्थाचा बेदम मारहाणीत मृत्यूही झाला असता, मुलीची अब्रूही वाचली नसती, अशी या घटनेबाबत परिसरात चर्चा आहे. अपहरणकर्त्यांनी मुलीला फोन करून तिच्या मोबदल्यात कुटुंब सोडण्याची मागणी केली. पोलिसांनी ही मागणी मान्य केल्याचे भासवून त्यांना सापळ्यात ओढले.
दोन खासगी कारमध्ये दोन अपहरणकर्ते मुलीला घ्यायला येताच पोलिसांनी सिनेस्टाईल धाड टाकून पाचही जणांना ताब्यात घेतले आणि रात्री ९:४५ वाजता अपहृत कुटुंबाची सुटका केली.
यावेळी अपहरणकर्ते गृहस्थाला बेदम मारहाण करत होते. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केला नसता तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी वैभव जैस्वाल, प्रशांत डांगे, गणेश डगळे, ओंकार पोपळघट व कुणाल पोपळघट यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, पोलिस हवालदार बाळासाहेब आंधळे, किशोर साबळे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*