छत्रपती संभाजीनगर : छोट्या गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी शहरातील एका ठेकेदाराला तब्बल ३० लाख ५७ हजार रुपयांनी गंडवले. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सायबर पोलिस तपास करत आहेत.
शेख मोहम्मद अब्दुल साजिद (वय ६०) असे फसवणूक झालेल्या ठेकेदाराचे नाव असून, यूट्यूबवरील एका बनावट गुंतवणूक जाहिरातीतून या फसवणुकीला सुरुवात झाली.
आयसीआय सिक्युरिटीज ग्रुपच्या नावाने चालवलेल्या जाहिरातीतून संपर्क साधल्यावर ‘विनिता पटोदिया’ नावाच्या महिलेने व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधला. तिने एक अॅप डाऊनलोड करून त्यात केवायसी भरायला सांगितले. बनावट अॅपवर डीमॅट खाते उघडल्याचे दाखवण्यात आले.
नंतर ‘अश्विन पारेख’ नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सअॅप ग्रुपवर मोठ्या परताव्याचे खोटे संदेश पाठवत साजिद यांचा विश्वास संपादन केला. पहिल्याच गुंतवणुकीनंतर २४ तासांत परतावा मिळाल्यामुळे त्यांनी आणखी मोठ्या रकमा गुंतवल्या.
गुंतवणुकीच्या नावाखाली ३० लाखांचा गंडा
४ मार्च रोजी ५० हजार रुपयांनी सुरुवात झालेल्या गुंतवणुकीत साजिद यांनी २४ मार्चपर्यंत ३० लाख ५७ हजार रुपये गुंतवले. अंती परतावा मिळवण्यासाठी त्यांना आणखी २१ लाखांची अट घालण्यात आली, तेव्हा त्यांना फसवणुकीचा अंदाज आला.
पोलिसांचा इशारा: अशा गोड बोलण्याच्या आमिषांना बळी पडू नका
सध्या सायबर गुन्हेगार विविध अॅप्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना जाळ्यात ओढत आहेत. नागरिकांनी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी ती कंपनी खरी आहे का, ती सेबी किंवा आरबीआय मान्यताप्राप्त आहे का, हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*